मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

नीतिसूत्रे 30

हा अध्याय या भागाचा आहे: Agur, Lemuël en de sterke vrouw

1याकेचा मुलगा आगूर याची वचने म्हणजे देववाणी आहेत. त्या पुरुषाने इथीएलाला, इथीएलाने उकालाला सांगितले, 2खचित मी खूप क्रूर आहे मनुष्य नाही; मला मानवजातीप्रमाणे समजदार बुद्धी नाही. 3मी ज्ञान शिकलो नाही, आणि जो पवित्र त्याचे ज्ञान मला नाही. 4आकाशापर्यंत चढून कोण गेला आहे आणि खाली उतरला आहे? कोणी वाऱ्याला आपल्या ओंजळीत एकवटून घेतला आहे? कोणी आपल्या कपड्यात जलाशय बांधून ठेवला आहे? पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापिल्या आहेत? त्याचे नाव काय किंवा त्याच्या मुलाचे नाव काय? खात्रीने ते तुला माहित आहे काय? 5देवाचा प्रत्येक शब्द पारखलेला आहे, जे त्याच्या आश्रयास येतात त्यांची तो ढाल आहे. 6त्याच्या वचनात काही भर घालू नको, घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील. 7मी तुझ्याजवळ दोन गोष्टी मागतो, मी मरण्यापूर्वी त्या मला देण्याचे नाकारू नको. 8पोकळ गर्व आणि लबाड्या माझ्यापासून दूर कर; मला खूप श्रीमंत किंवा खूप गरीब करू नकोस. मला आवश्यक तेवढेच अन्न दे. 9माझी जर अतीतृप्ती झाली तर मी तुला नाकारीन आणि परमेश्वर कोण आहे? असे म्हणेन; मी जर दरिद्री राहिलो तर मी कदाचित् चोरी करेन. आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करेन. 10सेवकाची निंदानालस्ती त्याच्या धन्याजवळ करू नको, करशील तर तो तुला शिव्याशाप देईल आणि तू अपराधी ठरशील. 11आपल्या पित्याला शाप देणारा, आणि आपल्या आईला आशीर्वाद देत नाही अशी एक पिढी आहे, 12त्यांच्या दृष्टीने आपणाला शुद्ध समजणारी, पण त्यांनी स्वतःची घाण धुतलेली नाही अशी एक पिढी आहे. 13ज्यांचे डोळे कितीतरी गर्विष्ठ आहेत, आणि ज्यांच्या पापण्या वर चढलेल्या आहेत अशी एक पिढी आहे. 14गरीबांना पृथ्वीतून व गरजवंताना मनुष्यामधून खाऊन टाकायला, जिचे दात तलवारीसारखे व जिच्या दाढा सुऱ्यांसारख्या आहेत अशी एक पिढी आहे. 15जळवेच्या दोन मुली आहेत, त्या दे, व दे अशा ओरडतात. तीन गोष्टी कधीही समाधानी नसतात, चार गोष्टी, कधीही पुरे म्हणत नाही. 16मृत्यूची जागा, वांझ उदर, पाण्याने तहानलेली पृथ्वी आणि जो अग्नी पुरे कधी म्हणत नाही. 17जो डोळा पित्याची चेष्टा करतो, किंवा त्याच्या आईची आज्ञा पाळणे तुच्छ मानतो, त्यांचे डोळे खोऱ्यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील आणि त्यास गिधडाची पिल्ले खाऊन टाकतील. 18मला तीन गोष्टी फार आश्चर्याच्या वाटतात, चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही. 19आकाशात उडणाऱ्या गरुडाचा मार्ग; दगडावर चालणाऱ्या सापाचा मार्ग, समुद्राच्या हृदयात जाणाऱ्या जहाजाचा मार्ग, आणि तरुण स्त्रीबरोबर पुरुषाच्या संबंधाचा मार्ग, 20हा व्यभिचारी स्त्रिचा मार्ग असा आहे; ती खाऊन तोंड पुसते, आणि म्हणते मी काही चुकीचे केले नाही. 21तीन गोष्टीने पृथ्वी कांपते, आणि चार गोष्टी तिला सहन होत नाहीत. 22जेव्हा दास राजा होतो, अन्नाने तुडुंब पोट भरलेला मूर्ख; 23विवाह झालेली त्रासदायक स्त्री; मालकिणीची वारस झालेली दासी. 24पृथ्वीवरच्या चार गोष्टी अगदी लहान आहेत; पण त्या अतिशय शहाणपणाच्या आहेत. 25मुंग्या अगदी लहान आणि दुर्बल असतात, पण तरीही त्या उन्हाळ्यात आपले अन्न साठवतात. 26ससे हे सशक्त प्राणी नाहीत, पण ते खडकात आपले घर करतात. 27टोळांना राजा नसतो, पण तरीही ते सर्व टोळीटोळीने बाहेर जातात. 28पाल आपण हातानी पकडू शकतो, तरी ती राजाच्या महालात सापडते. 29जे आपल्या चालण्यात डौलदार असतात असे तीन प्राणी आहेत, चौघांची आपली चालण्याची ढब सुरेख आहे, 30सिंह सर्व प्राण्यात सगळ्यात बलवान आहे तो कोणापासूनही मागे फिरत नाही. 31गर्वाने चालणारा कोंबडा, बोकड; आणि ज्याचे सैन्य त्याच्याजवळ आहे असा राजा. 32जर तू गर्वाने ताठ होण्याचे मूर्खत्व केले किंवा दुष्टता योजिली तर आपला हात आपल्या मुखावर ठेव. 33कारण जसे दूध घुसळण्याने लोणी निघते, आणि नाक पिळण्याने रक्त निघते, तसे राग चेतवल्याने भांडणे निर्माण होतात.

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.