मुख्य मजकुराकडे जा
बीटा

धागा अजून पूर्णपणे मराठी भाषेत भाषांतरित झालेला नाही. जे अजून भाषांतरित झाले नाही ते इंग्रजीत दाखवले जाते.

2 शमुवेल 7

हा अध्याय या भागाचा आहे: David koning

1राजा दावीद आपल्या नवीन घरात राहू लागला आणि परमेश्वराने त्यास भोवतालच्या सर्व शत्रूंपासून विसावा दिला. 2एकदा नाथान या संदेष्ट्यास दावीद म्हणाला, “इथे मी गंधसरुच्या लाकडापासून केलेल्या डौलदार घरात राहतोय आणि देवाचा कोश मात्र अजूनही राहुटीतच आहे. त्या पवित्र कोशासाठी आता चांगला निवारा बांधायाला हवा.” 3नाथान राजाला म्हणाला, “आपल्या मनात आहे तसे करा. परमेश्वराची तुम्हास साथ आहे.” 4पण त्याच दिवशी रात्री नाथानला परमेश्वराचे वचन ऐकू आले. परमेश्वर म्हणाला, 5“दावीद या माझ्या सेवकाला जाऊन सांग, ‘परमेश्वराचा निरोप असा आहे: माझ्यासाठी निवासस्थान बांधणारा तू नव्हेस. 6मी इस्राएल लोकांस मिसरमधून बाहेर काढले त्यावेळी कुठल्या ही घरात राहत नव्हतो, मी राहुटीतूनच फिरलो. तेच माझे घर. 7इस्राएल लोकांबरोबर मी जेथे जेथे गेलो, त्या त्या ठिकाणी, माझ्या इस्राएल लोकांचे मेंढपाळ व्हा म्हणून ज्यांना मी सांगितले त्या इस्राएल वंशातील कोणात्याही अधिकाऱ्याला “कधीही माझ्यासाठी तू गंधसरूचे, घर का बांधले नाहीस?” असे विचारले नाही. 8शिवाय दावीदाला हे ही सांग सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो, “तू कुरणात मेंढरांमागे फिरत होतास तेव्हाच मी तुला निवडले. तेथून तुला काढून मी तुला इस्राएल लोकांचा राजा केले. 9तू जेथे जेथे गेलास तेथे तेथे मी तुला साथ दिली. तुझ्या शत्रूंचा तुझ्यासाठी पाडाव केला. पृथ्वीवरील इतर महान लोकांप्रमाणे मी तुला सुप्रसिद्ध करीन. 10माझ्या इस्राएल लोकांसाठी मी जागेची निवड केली. त्यांना राहायला हक्काची जागा दिली, त्यांना रुजवले त्यांना जागोजागी भटकंती करायला लागू नये म्हणून मी हे केले. 11इस्राएल लोकांवर मी, परमेश्वर, शास्ते नेमिले होते तेव्हापासून दुर्जनांनी त्यांना त्रास दिला तसे आता घडणार नाही. तुझ्या सर्व शंत्रूपासून मी तुला शांती देतो. मी तुला असे अभिवचन देतो की, तुझे घराणे कायमचे राजघराणे होईल. 12तुझे जीवन संपुष्टात आले, म्हणजे तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या पूर्वजांशेजारी तुझे दफन होईल. पण मी तुझ्या पुत्रापैकीच एकाला राजा करीन. 13तो माझ्या नावाप्रीत्यर्थ मंदिर बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन. 14मी त्याचा पिता आणि तो माझा पुत्र असेल. त्याच्या हातून पाप घडले तर मी त्यास मनुष्याच्या काठीने आणि मनुष्यांच्या पुत्रांच्या चाबकांनी शासन घडवीन. 15पण माझे त्याच्यावरचे प्रेम खंडित होणार नाही. त्याच्यावर माझी कृपादृष्टी राहील. शौलावरील माझा लोभ आणि प्रेम संपुष्टात आले. मी तुझ्याकडे वळलो, तेव्हा तुझ्यासमोर मी त्यास दूर ढकलले. पण तुझ्या घराण्याच्या बाबतीत मी असे करणार नाही. 16राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील. तुझे राजासन टिकून राहील.” 17नाथानाने दावीदाला हा दृष्टांत आणि देवाचे सर्व बोलणे ऐकवले. 18यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला, “हे प्रभू, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस? 19हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे; तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बर्‍याच काळाचे सांगून ठेवले आहेस; प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहेस. 20मी आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच. 21तू करणार म्हणालास, आणि तुला तसे करायची इच्छा आहे; तेव्हा या अदभुत गोष्टी खरोखरच घडतील. मला, तुझ्या सेवकाला, तू त्याची पूर्णकल्पनाही द्यायचे ठरवलेस. 22ह्यास्तव हे माझ्या प्रभू, परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे, त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही. 23पृथ्वीच्या पाठीवर इस्राएलसारखे राष्ट्र नाही. इस्राएलाची प्रजा ही खास प्रजा आहे. ती गुलाम होती, तिला तू मिसरमधून सोडवलेस आणि मुक्त केलेस. तिला आपली प्रजा बनवलेस. इस्राएलांसाठी तू महान आणि अद्भूत चमत्कार केलेस. 24तू निरंतर इस्राएलाला स्वतःच्या कवेत घेतलेस. हे परमेश्वरा तू त्यांचा देव झालास. 25आता तर परमेश्वर देवा, तू या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिध्दीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करून तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करू दे. 26मग तुझ्या नावाचा महिमा वाढेल. लोक म्हणतील, सर्वशक्तिमान परमेश्वर देवाची इस्राएलवर सत्ता आहे. तुझी सेवा करायला तुझा सेवक दावीद याच्या घराण्याला बळ मिळू दे. 27सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तूच हे मला दाखवले आहेस तू म्हणालास, मी तुझ्यासाठी घर बांधीन, म्हणून मी तुझा सेवक तुझ्यापुढे ही प्रार्थना करण्याचे साहस करत आहे. 28प्रभू परमेश्वरा, तूच आमचा देव आहेस. तुझ्या सांगण्यावर माझा पूर्ण भरंवसा आहे. या सर्व चांगल्या गोष्टी माझ्याबाबतीत, तुझ्या या सेवकाच्या बाबतीत घडणार आहेत असे तू म्हणालास. 29आता माझ्या घराण्याला आशीर्वाद दे. माझा वंश सातत्याने चालू दे. हे प्रभू परमेश्वरा, तूच तसे म्हणाला आहेस आमच्यावर तुझ्या आशीर्वादाचे छत्र कायमचे राहील असा तुझा आशीर्वाद आहे.”

वचनांचे क्रमांक निवडलेल्या भाषांतराप्रमाणे असतात आणि काही अध्यायांत एका वचनाने वेगळे असू शकतात.

Statenvertaling (1637) · World English Bible (2000) · इंडियन रीवाइज्ड वर्जन (2019): © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, bridgeconn.com, via eBible.org. CC BY-SA 4.0; notes and headings omitted. · स्रोत आणि परवाने

वाचनाची सोय

जे उपयोगी पडेल ते निवडा. तुमची निवड याच डिव्हाइसवर जतन राहते.

मजकुराचा आकार

तुमच्या डिव्हाइसची स्वतःची सेटिंग्ज (झूम, स्क्रीन रीडर, डार्क मोड) वापरायला आवडतात? ती इथेही चालतात.